आता शेतकरी ही स्थापन करू शकतो कंपनी.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच खासगी क्षेत्रातमधील कंपन्या बघतो उदा. टाटा मोटर, जिओ, पार्ले इत्यादी.पण शेतकऱ्यांनाची कंपनी याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)बद्दल.
शेतकरी उत्पादक कंपनी/ Farmer Producer Company (FPC) म्हणजे काय?
शेतकरी उत्पादक कंपनी अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरीच सभासद होऊ शकतात. आणि शेतकरी सभासदच स्वतः कंपनीचे व्यवस्थापन करतात.
शेतकरी उत्पादक कंपनी चा उद्देश :-
शेतकरी हा ऊन-पाऊसामध्ये राबून आपला घाम गाळून शेतमाल पिकवतो. पण तयार झालेला माल विकायची वेळ येते त्यावेळी शेतकऱ्याची झोळी फाटलेली असते. आपण पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नसतो. तसेच शेतामध्ये लागणाऱ्या बी-बियाणे,खते, औषधे यांच्या किंमती ही शेतकऱ्याचा हातात नसतात. तसेच ग्राहकांच्या बाबतीत होते. शेतकऱ्यांना मिळणारा भाव व त्याच वेळी ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक असतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने 2013 साली कंपनी कायद्यामध्ये सुधारणा करून शेतकरी उत्पादक कायदा अंमलात आणला. ज्यामुळे शेतकरी आपली स्वतःची कंपनी स्थापन करू शकतात व आपल्या शेतमालाची विक्री करू शकतात. शेतकरी हा खऱ्या अर्थाने मालक होऊ शकतो.
शेतकरी उत्पादक कंपनी कोण स्थापन करू शकतो :-
1) किमान 10 शेतकरी सभासद एकत्र येऊन कंपनी स्थापन करू शकतात.
2)कंपनी स्थापन करण्यासाठी सभासद हा 7/12 व 8अ धारक शेतकरी असावा किंवा शेतकरी कुटुंबातील असावा.
3)किमान 5संचालक व 5 प्रवर्तक (प्रमोटर) कंपनीची नोंद करू शकतात.
4)दोन किंवा अधिक उत्पादक संस्था एकत्र येऊन कंपनी स्थापन करू शकतात.
शेतकरी उत्पादक कंपनी खालील प्रमाणे कामे करू शकते :-
1)शेतमालाची खरेदी-विक्री व साठवणूक.
2)खत, औषधे, बी-बियाणे यांचा पुरवठा करणे.
3)कृषी आधारित शेतमाल प्रक्रिया व अन्य व्यवसाय करणे.
4) समहू शेती व करार शेती करणे.
5)सभासदांना व अन्य शेतकऱ्यांना अवजारे भाड्याने देणे.
6)शेतमालाचे ग्रेडिंग, पॅकिंग, सॉर्टींगच्या सुविधा उपलब्ध करणे.
7) शासकीय योजनानंची व बाजार भावाची माहिती देणे इत्यादी.
कंपनीचे रजिस्ट्रेशन कोठे करावे:-
भारतीय कंपनी कायदा 2013 अंतर्गत कंपनी ही रजिस्टार ऑफ कंपनी पुणे, मुंबई यांच्याकडे रजिस्टर होते.
शेतकरी उत्पादक कंपनीला(FPC) मिळणारे फायदे व विविध योजना :-
1)शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाल्यापासून पुढील 5 वर्ष कंपनीच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
2)कंपनीला जास्तीत जास्त लोन NABARD व अन्य बँकाच्या माध्यमातून उपलब्ध केले जाते.
3)SFAC अंतर्गत Equity Grant योजनेच्या माध्यमातून कंपनी च्या भाग भांडवला एवढी रक्कम केंद्र सरकारच्या माध्यमातून 15 लाख मर्यादेपर्यंत अनुदान स्वरूपात दिली जाते.
4)SFAC च्या क्रेडिट ग्यारंटी फंड योजने अंतर्गत कंपनीच्या प्रोजेक्टच्या 85% किंवा जास्तीत जास्त 1 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याजदराने दिले जाते.
5)महाराष्ट्र राज्याच्या SMART योजने अंतर्गत 60 टक्के पर्यंत अनुदान प्रकल्पाना दिले जाते.
6)केंद्र, व राज्य शासनाच्या अन्य योजना उदा. PMFME, AFI या सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीला लागू होतात.
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:-
1)ओळखीचा पुरावा :-आधार कार्ड, मतदान कार्ड,पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
2)संचालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
3)निवासी पुरावा – विज बिल ,टेलिफोन बिल,बँक स्टेटमेंट,पासपोर्ट,शाळा सोडल्याचा दाखला ,मतदान नोंदणी कार्ड,ग्रामपंचायत दाखला यापैकी किमान दोन पुरावे आवश्यक आहेत.
3)७/१२ व 8अचा उतारा
4)कृषी अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यापैकी कोण एकाच्या सही शिक्यासह शेतकरी दाखला.
5)कंपनीच्या प्रस्तावित कार्यालयाचे चालू वीजबिल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा